साहित्यामुळे रंजल्या-गांजलेल्या लोकांना ऊर्जा व न्याय मिळते : रामचंद्र भोसले

खानापूर : बहुजननामा ऑनलाईन – साहित्य हे समाजमनाचा आरसा असून साहित्यातील ज्वलंत व वास्तव लिखाणाने निकोप समाजाची निर्मिती होत असते. साहित्यातून रंजल्या-गांजलेल्या लोकांना ऊर्जा व न्याय देण्याचे काम केले जाते असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष लेखक रामचंद्र भोसले (सातारा) यांनी केले. बलवडी येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने २७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते.
यावेळी भोसले बोलताना म्हणाले की, नव्या पिढीच्या हाती मोबाईलऐवजी पुस्तक दिले पाहिजे. पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. साहित्यातून माणसाला शहाणपण व संयम मिळतो. आचार व विचार हा माणसाच्या आयुष्याला नवा अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करतो. डॉ. बी. एन. पवार म्हणाले, देशात सध्या दोन प्रवाह प्रचलित आहेत. एक पुरोगामी व दुसरा प्रतिगामी प्रवाह आहे. पुरोगामी विचारांची कास धरण्यासाठी साहित्य हे प्रभावी व उत्तम माध्यम आहे. साहित्यातून पुरोगामी विचारांची निर्मिती होत असते. साहित्यात वेगवेगळे प्रवाह कार्यरत असून त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. दुभंगलेल्या माणसांची मने जोडणाऱ्या साहित्याची खऱ्या अर्थाने निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
सदरील कार्यक्रमास मारुती पवार, शिवाजी पवार, बी. डी. कुंभार, कुसुम सावंत, रामचंद्र कास्कर, सु. धों. मोहिते, महादेव दुपटे, बापूराव पवार, डी. एम. सरवदे, छबन तुपे, संजय निकम, दीपक कुलकर्णी, हरिभाऊ पुदाले, प्रा. संतोष जाधव, शहाजी जाधव यांच्यासह साहित्यरसिक उपस्थित होते. जे. डी. पवार यांनी प्रास्ताविक केले. ओंकार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश पवार यांनी आभार मानले.
Comments are closed.