बीड : बहुजननामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील मोरवड येथे वीज पडून सख्या बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बहिण भावाच्या मृत्यूमुळे गावावरती शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यातील मोरवड या गावातील रहिवाशी असलेले विष्णू अशोक अंडील (वय १७), पूजा अशोक अंडील (वय १५) हे दोघे आई – वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेले होते. शेतामध्ये कापूस लावण्याचे काम सुरु होते. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पाच वाजता गावात पावसाची सुरुवात झाली. पावसात भिजू नये म्हणून बहिण आणि भाऊ एका झाडाखाली थांबले. मात्र काही कळायच्या आत वीज झाडावर कोसळली. यात बहिण-भावाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
विष्णू हा पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तर मुलगी पूजा गावामधील विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होती. विष्णू पुण्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती चिंताजक असल्यामुळे गावी आला होता. परंतु, शुक्रवारी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे काळाने घाला घातला.