नवी दिल्ली : मागील काही दिवसांआपसु सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून आज (बुधवारी) तर सोन्याच्या दरांनी आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमती १,११३ रुपयांनी वाढून त्या ३७,९२० प्रति तोळा इतक्या झाल्या. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजारातील सोन्याची किंमत प्रथमच ३८ हजारांच्या जवळ पोहोचली आहे.
का महागले सोने :
बाजारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वाढत्या जागतिक मागणीसह स्थानिक पातळीवरील सराफांची मागणीही वाढल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत.अमेरिका-चीन च्या व्यापारामध्ये वाढणारा तणाव देखील किमती कडाडण्याचे महत्त्वाचे कारण आहे. या तणावात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सराफा बाजाराकडे वळले. अमेरिकेने मागच्या आठवड्यात केलेल्या घोषणेप्रमाणे चीनमधून आयात केलेल्या ३०० अरब डॉलर मूल्याच्या साहित्यावर १ सप्टेंबर पासून अतिरिक्त शुल्क लावले जाणार आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लवकरात लवकर व्यापारी सामंजस्य करारानुसार निर्णय न घेतल्यास शुल्क आणखी वाढविले जाईल. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर घसरल्याने देखील सोन्याचे भाव कडाडले आहेत.
सोन्याचे नवीन भाव :
देशाची राजधानी दिल्ली येथे ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असणाऱ्या सोन्याचा भाव प्रत्येकी १,११३ आणि १,११५ रुपयांनी वाढून अनुक्रमे ३६,९२० आणि ३७,७५० रुपये प्रती तोळ्यापर्यंत पोहोचला. गिन्नीचा भावही २०० रुपयांनी वाढून २७,८०० प्रति आठ ग्राम इतका झाला.
दुसऱ्यांदा झाली तब्बल १ हजार रुपयांनी वाढ :
यावर्षीच्या अर्थसंकल्पानंतर सोन्याचे भाव एक हजार पेक्षा अधिक रुपयांनी वाढण्याची हि दुसरी घटना असून याआधी ६ जुलै रोजी त्यात १,३०० रुपयांची वाढ झाली होती तर ११ जुलै रोजी ९३० आणि ५ ऑगस्ट ला ८०० रुपयांनी सोने महागले होते. ५ जुलै ला संसदेत अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्याचे भाव ३,७५० एवढ्या प्रचंड रुपयांनी महाग झाले आहे.