नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून अनेक देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा धसका सध्या संपूर्ण जगाने घेतला आहे. भारतात सुद्धा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला भारतातील पहिला रूग्ण केरळात सापडल्याने देशातील आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली होती. आता केरळातच पुन्हा कोरोना व्हायरसची लागण झालेला दुसरा रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या या रूग्णावर केरळातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. यापूर्वी भारतातील पहिला कोरोना व्हायरसचा रूग्ण केरळातच सापडला होता. एका तरूणीला याची लागण झाली होती. ही तरूणी चीनच्या वुहानमधील विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली होती. ती केरळातील थिसूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तिला संशयास्पद आजार झाल्याने रक्त तपासणी केली असता कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता केरळात आणखी एक कोरोना व्हायरसची लागण झालेला रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य खात्याने दक्षता घेतली असून सर्व विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे. चीनच्या वुहान प्रांतात अडकलेल्या भारतीयांना भारत सरकारने पुन्हा मायदेशी आणले आहे. 324 जणांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात आणण्यात आले होते. आता रविवारी पुन्हा 323 जणांना चीनमधून भारतात आणण्यात आले. यात चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.