मुंबई : बहुजनामा ऑनलाइन – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाशी संलग्न सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉ. ओंकार महेश ठाकूर (वय २१) याने दादर येथील बाल गोविंददास रोडवरील कोहिनूर टॉवरच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.
परीक्षेच्या भीतीमुळे त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ओंकारचे पालक, अधिष्ठाता, प्राध्यापक आणि सहकारी विद्यार्थी यांना यामुळे धक्का बसला आहे. त्याने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले, याचे आश्चर्य वाटत आहे. अभ्यासात निपुण आणि विविध वैद्यकीय समित्यांमध्ये सक्रिय असलेला आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा अशी त्याची केईएममध्ये ख्याती होती. त्याचे वडील मुंबई महापालिकेच्या सेवेत अभियंता आहेत.
ओंकारने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारत आयुष्य संपविले. ओंकारला तत्काळ सायन रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याने हे पाऊल का उचलले याबाबत चौकशी सुरू आहे.