बुलढाणा : बहुजननामा ऑनलाईन – अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा बदलाच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या त्यावरून देशभरात चांगलेच वातारण तापले होते. त्यातच मतदानाच्या वादावरून ‘अट्रॉसिटी’कायदा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बुलढाणा नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे यावरुन शिवसेनेच्या नगरसेविका व उपजिल्हाप्रमुख यांच्यात चांगलाच वाद उफाळून आलाय शिवसेनेच्या नगरसेविका नंदा संदीप कटारे यांच्या फिर्यादीवरून शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख दीपक आसाराम बोरकरसह अन्य एक अशा दोघांविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अट्रॉसिटी) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मतदान करण्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कटारे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सविस्तर वृत्त असे कि, ‘१३ जून रोजी खा. प्रतापराव जाधव यांचा सत्काराचा कार्यक्रम आटोपून त्र्यंबकनगरमधील घरी परतले असता घरामध्ये मी एकटीच होते. त्यावेळी बोरकर हे घरात आला आणि नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पत्नीला मतदान करायचे, असे सांगितले.
त्यावर मतदान कुणाला करायचे हा संविधानाने दिलेला माझा अधिकार आहे, असे कटारे यांनी त्याला सांगितले त्यावर दीपक बोरकरने जातीवाचक शिवीगाळ करत पतीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.’