बहुजननामा ऑनलाइन टीम – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जो बायडन यांनी शपथ घेतली. त्यानंतर पहिल्या महिला आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris)यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आहे. कमला हॅरिस अमेरिकेच्या ४५ व्या उपराष्ट्रपती ठरल्या असून हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान भारतातील तामिळनाडु येथील थुलसेंद्रपूरम येथे जल्लोष करण्यात आला.
कमला हॅरिस या ५६ वर्षांच्या आहेत. त्यांची आई भारतीय आणि वडील जमेकाई वंशाचे आहेत. त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन आहेत.
कमला हॅरिस निवडणूक जिंकल्यानंतरपासूनच त्यांचं आजोळ असलेल्या थुलसेंद्रपूरममध्ये उत्सवाचं वातावरण होतं. शपथविधी होताच थुलसेंद्रपूरममधील दुकानांमध्येही त्यांचे फोटो लावण्यात आले होते. कमला हॅरिस यांच्यासोबतच राष्ट्रपती जो बायडन यांचेही फोटो गावात लावल्याचं पाहायला मिळाले. यादरम्यान, लहान मुलंही कमला हॅरिस यांचे फोटो हातात घेऊन बागडताना दिसली. तसेच शपथविधी सोहळ्यानंतर लहान मुलांना चॉकलेट्सही वाटण्यात आली.
थुलसेंद्रपूरममध्ये कमला हॅरिस यांच्या आजोबांच घर आहे. कमला हॅरिस जेव्हा पाच वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्या थुलसेंद्रपूरम येथे आजोबांना भेटण्यासाठी गेल्या होत्या.कमला हॅरिस यांचे मामा गोपालन बालाचंद्रन दिल्लीच्या मालवीय नगर येथे राहतात. हॅरिस यांच्यावर त्यांच्या आजोबांचा फार प्रभाव होता. त्यांचे आजोबा भारतात मोठे सरकारी अधिकारी होते. तसेच त्यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. कमला हॅरिस यांनी लहान वयात भारत दौरा केला होता.