नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – दिवशी बु (ता. भोकर) येथील एका 5 वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी मंगळवारी (दि. 23) फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने अवघ्या 41 दिवसात या प्रकरणात न्याय निवाडा केला आहे.
बाबुराव माळेगावकर ऊर्फ बाबुराव उकंडू सांगेराव असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथे 20 जानेवारी सालगडी असलेल्या आरोपीने 5 वर्षीय बालिकेस गावातीलच कोरड्या नदीपात्रात नेवून तेथे अमानुष अत्याचार करुन हत्या केली होती. याबाबत मयत चिमुकलीच्या वडिलांनी भोकर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी सालगडया विरोधात हत्या आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली होती. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 19 दिवसात तपास पूर्ण करून 10 फेब्रुवारी रोजी आरोपीविरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय भोकर येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने 39 जणांची साक्ष तपासून तसेच वैद्यकीय पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अॅड रमेश राजुरकर यांनी काम पाहिले आहे.