मुंबई : बुहजननामा ऑनलाईन – रिलायन्स इंडस्ट्रीची 12 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. या 12 रोजी होणाऱ्या सभेत गिगाफायबरच्या लाँचिंगबाबत घोषणा होऊ शकते. या जिओ गिगाफायबर सेवेमुळे ब्रॉडबँडच्या बाजारपेठेत मोठी घडामोड आणि बदल घडून येण्याची शक्यता आहे. या जिओ गिगाफायबर सेवेत भारतातील घरगुती ब्रॉडबँड, मनोरंजन आणि स्मार्ट होम इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या ब्रॉडबँडचा समावेश आहे. एका वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
मागच्या आठवड्यात मुकेश अंबानी यांनी तिमाही निकाल जाहीर केला. यावेळी अंबानी यांनी जिओ गिगाफायबर सेवांची बीटा चाचणी यशस्वी झाल्याची आणि स्मार्ट होम सोल्युशन्सचे संपूर्ण पॅकेज 5 कोटी घरात पोचवण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते. त्यावेळीपासून जिओ गिगाफायबर लाँचिंगबाबत चर्चा होताना दिसत आहे. अंबानी यांना असे वाटते की, देशात अजूनही वायरलेस नेटवर्क अनेक ठिकाणी पोचलेले नाही. त्यामुळे जिओ गिगाफायबर सेवेच्या माध्यमातून हे वायरलेस नेटवर्क 5 कोटी घरात पोचवता येऊ शकतं असं त्यांचं मत आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात जिओ गिगाफायबरची पहिली घोषणा करण्यात आली होती. जुलै महिन्यातील वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी ही घोषणा केली होती. यानंतर कंपनीने गिगाफायबरच्या नोंदणीला सुरुवात केली. यामध्ये तब्बल 1100 शहरांचा समावेश आहे. जिओने टेलिकॉम क्षेत्रात अनेक बदल घडवून आणले आहेत. यानंतर आता ब्रॉडबँडच्या बाजारपेठेतही मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गिगाफायबरची खासियत म्हणजे या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, आयपीटीव्ही आणि लँडलाईन कनेक्शन यांचे कॉम्बिनेशन केवळ 600 रुपयांत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय या ऑफरमध्ये महिन्याभरासाठी ग्राहकांना 100 जीबी डाटाही मिळण्याची शक्यता आहे.