नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या खराब कामगिरीबद्दल त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. गावस्कर यांनी म्हटले होते की लॉकडाऊनमध्ये त्यांनी फक्त अनुष्का शर्माच्या गोलंदाजीचा सामना केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनुष्काला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते, त्यावर त्यांनी मॅचच्या दुसर्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून गावस्करांच्या टिप्पणीवर टीका केली होती. माजी कर्णधाराला सोशल मीडियावरही बर्याच लोकांचा पाठिंबा मिळाला. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणही गावस्करांच्या समर्थनार्थ उतरले आहेत आणि त्यांनी अनुष्का शर्मावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
अनुष्का शर्मा यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘मिस्टर सुनील गावस्कर, मी आपल्याला सांगू इच्छिते की तुमचे वक्तव्य खूप अप्रिय आहे. मला असे विचारायचे आहे की तुम्ही अशी विधाने का करता आणि क्रिकेटपटूच्या कामगिरीबद्दल त्याच्या पत्नीला दोष का देता? मला हे चांगले ठाऊक आहे की तुम्ही गेल्या काही वर्षांत प्रत्येक क्रिकेटपटूच्या वैयक्तिक आयुष्याची रिस्पेक्ट केली आहे, मग ते माझ्या बाबतीतही झाले पाहिजे असे आपणास का वाटत नाही.’ यावर इरफान पठाण यांनी ट्विट करुन लिहिले की, ‘सुनील गावस्कर सर मी नेहमीच तुमचा आदर करतो.’ हे ट्विट अनुष्काच्या त्या विधानावर आहे ज्यात त्यांनी गावस्कर यांच्या विधानाला अप्रिय म्हटले आहे.
Always respect #SunilGavaskar sir always
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 25, 2020
अनुष्काने पुढे लिहिलं होतं की, ‘मला खात्री आहे की काल रात्रीपासून माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करण्यासाठी आपल्या मनात अनेक विधाने आणि शब्द असतील पण माझे नाव त्यात असेल तरच फरक पडणार आहे का? त्या म्हणाल्या की हे 2020 आहे आणि माझ्यासाठी अजूनही गोष्टी बदललेल्या नाहीत. कधी असे होईल जेव्हा मला क्रिकेटमध्ये ओढले जाणार नाही आणि असे एकतर्फी भाष्य केले जाणार नाही? रिस्पेक्टेड मिस्टर गावस्कर, तुम्ही एक महान खेळाडू आहात ज्यांचे नाव या खेळामध्ये उच्चस्थानी आहे. मला फक्त एवढेच सांगायचे होते की जेव्हा आपण असे म्हटले तेव्हा मला कसे वाटले.’
अनुष्काच्या एवढ्या मोठ्या आरोपांवर सुनील गावस्कर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, ‘मी त्यांना (अनुष्काला) कुठे दोष देत आहे? मी सेक्सिस्टवर कधी भाष्य केले? मी केवळ त्या व्हिडिओचा संदर्भ देत होतो, जो कुणीतरी जवळच्या बिल्डिंगमधून रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर टाकला. विराटने कोणताही सराव केलेला नव्हता आणि जो सराव केला होता तो केवळ तेवढाच होता, जेव्हा ते आपल्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये अनुष्काच्या गोलंदाजीला सामोरे जात होते. मी हेच म्हटलं होतं.’ विशेष म्हणजे लॉकडाऊन दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये विराट बिल्डिंग कंपाऊंडमध्ये फलंदाजी करीत होते आणि अनुष्का गोलंदाजी करीत होत्या. लॉकडाऊनच्या वेळी सर्व भारतीय क्रिकेटपटू घरातच बंद होते आणि क्रिकेटर्स सराव करण्यास असमर्थ होते.