पॅरीस : वृत्तसंस्था – ग्रीस आणि तुर्कीत गेल्या काही दिवसांपासून भूमध्य सागरात तणाव वाढू लागला आहे. फ्रान्सनं तुर्कीच्या आक्रमक भूमिकेविरोधात ग्रीसला लष्करी मदत देण्याची घोषणा केली होती. तुर्कीच्या अद्ययावत एफ 16 फायटर जेटचा सामना करण्यासाठी फ्रान्स ग्रीसला 18 राफेल लढाऊ विमानं देणार आहे. यातील 10 विमानं ही राफेलच्या एफ 3 आर व्हॅरिएंटची असणार आहेत. तर उर्वतरीत 8 विमानं सेकंड हँड जेट्स असतील. यासाठी मात्र ग्रीसला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.
तुर्कीच्या राष्ट्रपतींनी ग्रीसला धमकी दिल्यानंतर फ्रान्सनं ग्रीसच्या संरक्षणासाठी भूमध्य सागरात आपलं नौदल तैनात केलं. यानंतर तुर्की आणि फ्रान्स यांच्यातील तणाव वाढू लागला. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फ्रान्सवर टीका केली होती. फ्रान्सकडून युद्ध छेडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले होते. मित्र देशाच्या संरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास मागे हटणार नाही असं फ्रान्सनं म्हटलं होतं.
तुर्कीनं काही आठवड्यांपर्वीच ग्रीसला घाबरवण्यासाठी कस्तेलोरिजो बेटाजवळ नौदलाची काही जहाजं पाठवली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल ग्रीसनंही आपलं नौदल कस्तेलोरिजो बेटाजवळ तैनात केलं आहे. दोन्ही देशांचं नौदल या भागात उभं ठाकलं आहे. नौसैनिकांची संख्या वाढत असल्यानं युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
तुर्की-ग्रीसमध्ये नेमका वाद काय ?
मागील काही दिवसांपासून तुर्कीचे ओरूक रीस तेल शोधक जहाज हे ग्रीसच्या अखत्यारीत असणाऱ्या कस्तेलोरिजो या बेटाजवळ तेल विहिर, नैसर्गिक वायू साठ्याबाबत संशोधन करत आहे. ग्रीसनं यावर आक्षेप घेतला आहे. तुर्कीचं जहाज हे ग्रीसच्या हद्दीत आलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
भूमध्य सागराच्या ताब्यावरून तुर्की आणि ग्रीस यांच्या जुना वाद आहे. पूर्व भूमध्य सागराच्या हायड्रोकार्बन साठ्याच्या शोधानंतर ग्रीस आणि तुर्कीच्या ऊर्जा संपत्तीच्या ताब्यावरून वाद सुरू आहे. या भागात तुर्की अवैधपणे उत्खनन करत आहे असा दावा ग्रीस आणि युरोपीयन संघानं केला आहे. हा भाग आमच्या विशेष आर्थिक क्षेतात येत असं त्यांचं म्हणणं आहे.