मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा लक्षात घेऊन दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी युती सरकार सर्वोपतरी प्रयत्न करत असून दादरमधील इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुतळ्याची उंची एकूण ४५० फूट होणार आहे.
विधिमंडळाच्या प्रश्नोत्तराच्या तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी निश्चित केली होती. उंची वाढवल्यामुळे आता पुतळा ४५० फूट इतका उंच होणार आहे. २०२० सालापर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण होणार असून पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
इंदू मिल येथे होणाऱ्या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून याठिकाणी प्रशस्त ग्रंथालय, ई-लायब्ररी, विपश्यना केंद्र, सभागृह उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.
याआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने कमी करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तसंच चौकशी केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला होता.