नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – परदेशातील भारतीयांना संस्कृतिरक्षण, रूढी आणि परंपरांचे जतन महत्त्वाचे वाटत असल्याने ते भाजपशी जोडले गेले आहेत असे मत काँग्रेसच्या विदेशी विभागाचे प्रमुख आणि ज्ञान आयोगाचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी येथे व्यक्त केले. एक कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना पित्रोदा यांनी काही मुद्द्यावर विवेचन केले. अमेरिकेत आज लक्षावधी भारतीय आहेत. शिकागोमध्ये काही वर्षांपूर्वी केवळ ५०० भारतीय होते, ती संख्या आज तीन लाखांवर गेली असून त्यांना लक्षावधी डॉलर्स वेतन मिळत आहे. शिकागोमध्ये १९६५ आसपास एकही मंदिर नव्हते आज तेथे ३० हून अधिक मंदिरे आहेत. येथे भारतीय पूजा, होमहवन करतात. तेथील भारतीयांना आपल्या संस्कृतिरक्षणाचे महत्त्व खूप असून त्यातून ते भाजपशी जोडले गेले असावेत, असे पित्रोदा यांनी सांगितले.
निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना पित्रोदा यांनी ही आश्वासने निश्चितपणे पूर्ण करता येतील, आम्ही रोजगार हमी योजनेची उद्दिष्टे साध्य केली होती, असे स्पष्ट केले. पुलवामा हल्ल्याबाबत व्यक्त केलेली मते ही माझी वैयक्तिक होती. त्याचा काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.