धुळे : बहुजननामा ऑनलाइन – जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात यावी. ज्या कलावंतांची मानधनासाठी निवड झालेली आहे. त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाने जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले.
जिल्ह्यातील शाहीर कलावंत, साहित्यिक, कवी, लेखक, तमाशा कलावंत, वारकरी संप्रदाय, एकतारी, लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, टिंगरीवाला या कलावंतांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर कलावंतांना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधनावर मिळत नाही. वृद्ध कलावंतांना शासकीय अधिकारी, कर्मचारी दाद देत नाहीत. शिवाय त्यांचा अपमान केला जातो. तालुकास्तरावर वृद्ध कलावंतांच्या प्रस्तावाची पोच अनेकांना मिळाली नाही. कलावंतांवर वारंवार अन्याय होत आहे. म्हणून कलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाने आंदोलन केले.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कलावंतांनी ठिय्या मांडला होता. यावेळी सीईओ गंगाथरन यांना निवेदन देण्यात आले. यात ज्या कलावंतांची मानधनासाठी निवड झाली आहे. त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे. वृद्ध कलावंतांच्या मानधनात पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करावी. प्रतीवर्षी कलावंतांचे ३०० प्रस्ताव मंजूर करावेत. वृद्ध कलावंत मानधन प्रस्तावाच्या वयोमर्यादेत ४० वर्षांपर्यंत शिथिलता असावी. कलावंतांच्या मुलांचे शिक्षण शूल्क १०० टक्के माफ करावे. आजारी वृद्ध कलावंतांना मोफत शासकीय वैद्यकीय सेवा मिळावी. एस.टी. व रेल्वे प्रवास भाड्यात ७५ टक्के सूट मिळावी. कलावंतांच्या मुलांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. जिल्हा व तालुकास्तरावर कलावंतांना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधनावर मिळायला पाहिजे, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
याप्रसंगी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, प्रदेश महासचिव नानाभाऊ वाघ, फुला गवळे, वसंत कुंवर, निंबा चौधरी, भाईदास गवळे, रवींद्र पाटील, ताराचंद गवळे, त्र्यंबक जगदाळे, काशीनाथ गवळे, नथ्थू साळुंके, खंडू वानखेडे, आसाराम अहिरे, शंकर मोरे, अशोक निकुंभ, पंडीत बोढरे, निंबा बेडसे, दिगंबर वाघ, हिंमत पवार, भालेराव पाटील, पांडूरंग वाघ, राजेंद्र वाघ, रजेसिंग गिरासे, वेडूसिंग गिरासे उपस्थित होते..