बहुजननामा ऑनलाईन – फेक ई-मेल आणि फेक एसएमएस पासून सावध राहण्यासाठी आयकर विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ई-मेल आणि एसएमएस द्वारे इनकम टॅक्स रिफंडविषयी मिळणारी माहिती ही अधिकृत नसून यापासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी आयकर विभागाने पुन्हा एकदा संदेश जारी केला आहे. असे खोटे ई-मेल आणि एसएमएस मिळाल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून आल्यानंतर आता आयकर विभागाने सोशल मीडियावर एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जर तुम्हाला एसएमएस द्वारे टॅक्स रिफंड मिळवण्यासाठी http://151.80.90.62/ITRefund या लिंकवर क्लीक करा असा मेसेज आला असेल तर या लिंकवर क्लीक करू नका. कारण ही लिंक अधिकृत नाही.
आयकर विभागाकडून करदात्याने ट्विटरवर उत्तर मागितले –
अशा प्रकारचे एसएमएस मिळालेल्या एका करदात्याने याची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाशी संपर्क साधला आणि ट्विटर हँडलवर हा एसएमएस शेअर करत या करदात्याने विचारले आहे की, हा एसएमएस बरोबर आहे का ? यावर आयकर विभागाने सांगितले की, त्यांच्या वतीने असा कोणताही एसएमएस पाठविला जात नाही. हा एसएमएस पूर्णपणे बनावट आहे.
https://twitter.com/nirmohia/status/1173213586463821824
असा एसएमएस तुम्हाला मिळाल्यास काय कराल ?
जर तुम्हालाही अशा पद्धतीचा एसएमएस आला असेल तर तो त्वरितच आयटी विभागाकडून चेक करून घ्या. एसएमएस चेक करण्यासाठी तुम्ही ट्विटर हँडल किंवा अधिकृत ईमेलची मदत घेऊ शकता.
एसएमएस बनावट आहे कसा ओळखाल ?
या पद्धतीचा बनावट एसएमएस ओळखण्याचा एक पर्यायही आयकर विभागाने सांगितला आहे. ईमेल किंवा एसएमएस द्वारे आयकर विभाग कोणत्याही करदात्याकडून कोणतीही माहिती विचारत नाही. जर कोणी अज्ञात व्यक्ती आपला पिन, संकेतशब्द, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याची माहिती विचारत असेल तर ती देऊ नका.
असे होऊ शकते तुमचे नुकसान –
फेक एसएमएस लिंकसहित आला तर त्यावर क्लीक करणे तुमच्यासाठी महागात पडेल. कारण लिंकवर क्लीक केल्यानंतर युजरनेम, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड यासारखी माहिती मागितली जाते. अशा वेळी चुकूनही आपली माहिती शेअर केल्यास नुकसान होऊ शकते.
Visit : bahujannama.com