सांगली : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीच्या सांगली मतदारसंघासाठीचा उमेदवार बदलला जाणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि जतचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश शेंडगचे चुलत बंधू जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आघाडीच्या उमेदवार देण्यावरुन असलेला तिढा आणि सध्याची बदलती रजकीय परिस्थिती पाहून अधिक सक्षम उमेदवार द्यावा असा विचार वंचित आघाडीकडून होताना दिसत आहेत .
उमेदवारीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आज पार पडली त्यात प्रकाश शेंडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून आज याची अधिकृत घोषणा होऊ शकते.
प्रकाश शेंडगे सांगलीच्या राजकारणात जास्त सक्रिय असून यांची ओळख ,ओबीसी नेते म्हणून आहे तसेच सांगली लोकसभा मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रकाश शेंडगे जर वंचित आघाडीचे उमेदवार जाहीर झाले तर सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे .
“धनगर समाजाला राज्याच्या एकाही पक्षाने या निवडणुकीमध्ये संधी दिली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संधी मिळाल्यास या सरकारविरोधात लढण्यास तयार आहोत,” असं प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केलं आहे. आता प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार आहे.