बहुजननामा ऑनलाइन टीम – पुण्यातील हडपसर परिसरामध्ये पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप झाले असून, राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नितेश राणे यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर टीका केली आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येवरुन राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली असताना नितेश राणे यांनी ट्विट करुन या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, जे दिशाबरोबर झाले, तेच पूजाबरोबर होणारा असेल… तर तो ‘शक्ती’ कायदा… काय चाटायचा आम्ही ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
जे दिशा बरोबर झाले..
तेच पुजा बरोबर होणार असेल..
तर तो "शक्ती" कायदा.. काय चाटायचा आम्ही?
— nitesh rane (@NiteshNRane) February 12, 2021
कोण आहे पूजा चव्हाण ?
पूजा चव्हाण (वय-22) ही तरुणी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आहे. बीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी ती पुण्यात आली. ती पुण्यात हडपसर परिसरात वास्तव्यास होती. पुण्यात आल्यानंतर दोनच आठवड्यात राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन तिने आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणात राज्य सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काल (दि.12) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक यांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणी केली.
मोबाईल, लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह गोष्टी
आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण या तरुणीचे मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी लॅपटॉप आणि मोबाइल जप्त केला आहे. यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, अन्यथा दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.