बहुजननामा ऑनलाइन टीम – बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यामुळंच तरुणीनं आत्महत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यातील विविध ऑडिओ व्हायरल झाल्या आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात पुढं आलं आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राऊतांनी या प्रकरणी बोलताना सावध पवित्रा घेतला आहे.
पूजा चव्हाण नावाच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेच्या एका मंत्र्याचं नाव पुढं आलं आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, यावर राज्याचे मुख्यमंत्री बोलतील. माध्यमांशी या प्रकरणी सविस्तर बोलणं त्यांनी टाळलं आहे.
दरम्यान या प्रकरणी आता विविध ऑडिओ व्हायरल झाल्या आहेत. एक कार्यकर्ता कथित मंत्र्याला फोन करून सांगतो आहे की, आत्महत्येचे वेड तिच्या डोक्यातून काढून टाका. आत्महत्या पर्याय नाही. कितीतरी पोरींची ती आयडल आहे. ती आत्महत्या करतेय म्हणजे अवघड आहे. तुम्ही तिला समजवा. त्यावर मंत्री म्हणतात, तिला एवढं स्पष्ट बोलूनही तिच्या डोक्यात तोच विषय आहे, त्यावर कार्यकर्त्यांनी तिला ट्रीटमेंट करूया असं म्हटलं होतं. तर ती ट्रीटमेंट करायला तयार आहे परंतु त्यानंतर आत्महत्या करेन असं ती तरुणी सांगत असल्याचं कार्यकर्त्यानं मंत्र्यांला सांगितलं.
इतकंच नाही तर मुलीच्या आत्महत्येनंतर कथित मंत्री आणि कार्यकर्ता यांच्यात पुन्हा संवाद झाला. ही ऑडिओ क्लीप बंजारा भाषेत आहे. आत्महत्येनंतर अरुण नावाचा कार्यकर्ता तिथंच उपस्थित होता. मंत्री त्या अरुणला दरवाजा तोड आणि तिचा मोबाईल काढून घे असं सांगत असल्याचं ऐकायला मिळत आहे. फोन त्यांच्या हाती लागू देऊ नको. त्यावर कार्यकर्ता मी पुन्हा फोन करतो फोन सुरूच ठेवा असं कथित मंत्र्याला म्हणत आहे. बतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लीपमधील आवाज तपासण्यासाठी त्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या आहेत.