बहुजननामा ऑनलाईन टीम – छत्तीसगड येथील कौतुकास्पद घटना. छत्तीसगड येथील अनुभव सिंह आणि विभा सिंह या दांपत्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांनी मेरिट लिस्टमध्ये पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला. एकमेकांच्या मदतीनेच हे यश प्राप्त झाल्याचे मत या दाम्पत्यांनी केला आहे.
हे दांपत्य रायपूरचे रहिवाशी आहेत. CGPSC ने मुख्य नगरपालिका अधिकारी ग्रेड ए आणि बी श्रेणीच्या ३६ जागांसाठी जाहिरात काढली होती. यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात आली होती. १० जुलै रोजी CGPSC च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.या परीक्षेत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत अनुभव यांना ३०० पैकी २७८ गुण मिळाले तर विभा यांना ३०० पैकी २६८ गुण मिळाले आहे. तर मुलाखतीत अनुभवला ३० पैकी २० आणि विभाला ३० पैकी १५गुण मिळाले होते. २००८ पासूनच अनुभवने विविध २० परीक्षा दिल्या होत्या. या काळात त्यांची चार वेळा निवडही झाली होती.
या दरम्यान अनुभव आणि विभा यांनी एकमेकांना प्रेरणा दिली. काही काळ तर त्यांनी अभ्यासासाठी नोकरीही सोडली होती. अशा परिस्थितीवेळी कित्येकदा त्यांना लोकांचे बोलणे ऐकावे लागायचे पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करत अभ्यास सुरूच ठेवला होता. अनुभवने परीक्षेच्या तयारीसाठी नोकरी सोडली होती. विभा परीक्षेच्या अभ्यासासोबतच नोकरीही करायची. विभाला सकाळी ७ वाजता ऑफिस असल्याने त्या पहाटे ५ वाजता उठायच्या. यादरम्यान पतीने केलेले नोट्स विभा यांनाही उपयोगी आल्या होत्या. या अशा अथक प्रयत्नांमुळेच आज अनुभवला पहिला क्रमांक तर विभाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.