पुणे : बहुजननामा ऑनलाईन – ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या संभाव्य कोरोनाव्हायरस लसीचा डोस मंगळवारी पुणे येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज येथे मानवावर दुसर्या टप्प्याच्या चाचणीसाठी दाखल झाला. ही माहिती एका अधिकाऱ्याने दिली. संस्थेच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की ही चाचणी बुधवारपासून सुरू होऊ शकेल. ही संस्था सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतामध्ये मानवांवर चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या 17 संस्थांपैकी एक आहे.
भारती विद्यापीठातील मेडिकल कॉलेज व रुग्णालय व संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय लालवानी म्हणाले की, ‘सुरुवात करण्यासाठी आम्ही पाच स्वयंसेवक ओळखले आहेत, ज्यांची कोविड -19 आणि अँटीबॉडीजची चाचणी घेतली जाईल आणि ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांना बुधवारी लसीकरणासाठी निवडले जाईल.’ या लसीचा एक डोस प्राप्त करण्यासाठी निवडलेले लोक 18 ते 99 वर्ष वयोगटातील असतील.
या रुग्णालयांमध्ये घेण्यात येणार आहे चाचणी
रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल म्हणाले की लसीकरणानंतर ते मानक चाचणी प्रोटोकॉलनुसार स्वयंसेवकांवर नजर ठेवतील. ज्या इतर रुग्णालयांमध्ये चाचणी केली जाणार आहे त्यांमध्ये पुणे स्थित बी.जे. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, एम्स दिल्ली, पुणे, पटना येथील राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, चंडीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, गोरखपूरमधील नेहरू हॉस्पिटल आणि विशाखापट्टणममधील आंध्र मेडिकलचा समावेश आहे.
दोन देशी लसी देखील दुसर्या टप्प्यात
लस तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी एसआयआयने ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी अॅस्ट्रॅजेनेकाबरोबर मिळून जेनर इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारा विकसित संभाव्य लस उत्पादनासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले होते की कोविड -19 च्या दोन देशी लसींच्या मानवी क्लिनिकल चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि चाचणी दुसर्या टप्प्यात पोहोचली आहे. यापैकी एक लस आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केली आहे आणि दुसरी लस झायडस कॅडिला लिमिटेडने तयार केली आहे.