लखनऊ : वृत्तसंस्था – हनी ट्रॅपमध्ये फसवणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्या एका टोळीचा लखनऊ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात 3 पुरूष आणि 2 महिलाचा समावेश असून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे.
पंकज गुप्ता, अतुल सक्सेना आणि अजीजुल हसन सिद्दीकी यांच्यासह अन्य दोन महिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हजरतगंज येथे राहणा-या एकाने पोलिसांकडे तक्रार केली होती की, 2 महिला आणि 3 पोलीस मिळून त्याला ब्लॅकमेल करत आहेत. त्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत आहेत. यादरम्यान पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, 2 महिला आणि 3 पोलीस कानपूर रोडवर उभ्या असलेल्या गाडीत त्याच्याकडून पैसे घेण्यासाठी आले आहेत. पोलिसांची एक टीम लगेच घटनास्थळी पोहोचली. त्यावेळी 3 आरोपी पोलिसांच्या वर्दीत होते. तसेच त्यांच्यासोबत दोन महिला होत्या. पोलिसांनी पाचही जणांना ताब्यात घेतले आहे. दोन महिला शिकार फसवण्याचे काम करत होत्या.
पोलीस आयुक्त डी. के. ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गॅंग प्रोफेशनल पद्धतीने सोशल मीडिया साइटवरून लोकांसोबत फोनवरून गोड बोलून त्यांना जाळ्यात अडकवत असत. त्यानंतर पुरूषांना ठरलेल्या ठिकाणी बोलावून घेत असत. एखादाने ठरलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर 2 महिला त्या व्यक्तीसोबत अश्लील गोष्टी करत असत. त्यानंतर त्या त्यांचे कपडे काढत होत्या. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तिथे 3 लोक पोलिसांच्या वर्दीत येऊन कपडे काढलेल्या व्यक्तीचा व्हिडीओ-फोटो काढत होते. त्यानंतर या गॅंगकडून काढलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून पैसे वसूल केले जात होते. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई केली आहे.