वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट येथील घटनेच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या तो नागपूर येथील कारागृहात आहे. या घटनेत प्राध्यापिकेला जाळून मारणाऱ्या विकेश नगराळे (वय २७) याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली असल्याची माहिती आहे. मात्र नागपूरच्या कारागृह प्रशासनाने या बाबीचा इन्कार केला आहे.
विकेश नगराळे याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणावरुन त्याला नागपूरला हलविले असून कारागृहातील एका सेलमध्ये त्याला ठेवण्यात आले आहे. विकेशने सोमवारी फाशी लावण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रकार तेथे असलेल्या गस्तीवरील पोलिसांना तातडीने लक्षात आला. त्यांनी त्याला वाचविले. नागपूर कारागृह प्रशासनाने वर्धा येथील अधिकारी तसेच तपास अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली आहे. मात्र, त्याबाबत कोणीही अधिकृतपणे काहीही सांगण्यास तयार नाही.
काय आहे प्रकरण ?
24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. पण सोमवार 10 फेब्रुवारी सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.