नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाइन – भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच आहे. कारण अवघ्या महिनाभरातच तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्रि. ऍथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.९ सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले. देशभरात तिचे कौतुक केले जात आहे. तिची यशाची घोडदौड सुरुच आहे.
२ जुलैला हिमाने पोजनान अॅथलेटिक्स येथील ग्रां. प्री. स्पर्धेत सहभागी होऊन २०० मीटरची शर्यत २३.६५ सेकंदात पूर्ण करुन सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर ७ जुलैला कुटनो अॅथलेटिक्स येथील मीट स्पर्धेत देखील २०० मीटरची शर्यंत तिने पार करत सुवर्णपदक जिंकले. १३ जुलैला झेक प्रजात्ताक येथील क्लांदो अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. १८ जुलैला झेक प्रजासत्ताक येथीलच टबोर अॅथलेटिक्स मीट स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले. या चार सुवर्णपदकानंतर शनिवारी तिने झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां. प्री. स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत बाजी मारत सुवर्णपदक पटकावले.
पाचवे सुवर्ण पदक पटकावल्या नंतर हिमाने स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. हिमा दासच्या या अभूतपर्व कामगिरीबद्दल तिचे देशभर कौतुक करण्यात येते आहे. सोशल माध्यमध्ये देखील हिमा दास ट्रेंड करत असून अनेकांनी तिचे कौतुक आणि तिच्या संघर्षाच्या कथा शेअर केल्या आहेत.