धर्मशाला : बहुजननामा ऑनलाईन – क्रिकेट खेळून घराकडे परतत असताना झालेल्या किरकोळ वादातून बॅटने मारहाण केल्याने एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात बुधवारी (दि. 30) ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
मोहित (वय 15) खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तनुज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत मोहितच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित आणि त्याचा मित्र तनुज दोघेही बुधवारी क्रिकेट खेळून घराकडे परत येत होते. त्यावेळी कोणत्या तरी कारणावरून दोघात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या तनुजने हातातील बॅटने मोहितच्या डोक्यात सपासप वार केले. हल्ल्यात मोहित जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर तनुज घटनास्थळावरून फरार झाला. आसपासच्या काही लोकांनी मोहितला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. पण त्याची प्रकृती लक्षात घेता त्याला डॉ. राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज टांडा येथे हलविण्यात आले. त्यानंतर तिथून त्याला चंदीगडच्या पीजीआय रग्णालयात रेफर केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान मोहितच्या काकूंनीही पोलीस आणि तांडा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, मोहितचे काका एफआयआरची प्रत घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी तिथे तैनात पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच तांडा रुग्णालयाने वेळेवर रुग्णवाहिका पाठवली नाही. त्यामुळे त्या पोलीसाला निलंबित केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मोहितच्या काकूने घेतली आहे. याप्रकरणी डीएसपी सिद्धार्थ शर्मा म्हणाले की संबंधित आरोपांची चौकशी केली जात असून जे सत्य बाहेर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. तर मोहितच्या खून प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.