नवी दिल्ली : वृतसंस्था – फरिदाबाद मधल्या एका सिव्हिल रुग्णालयातून एक संतप्त घटना समोर आली आहे. रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत होतं. त्याचदरम्यान स्ट्रेचरवरून त्याला नेताना रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच उशी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्रदीप शर्मा (वय ४२ )असे या रुग्णाचे नाव आहे. हा फोटो समोर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.
फरिदाबादमधील भूड कॉलनीतील राहत असलेले प्रदीप जवळच्याच एका कंपनीत कामाला होते. प्रदीप बडखल उड्डाणपुलाच्या खाली रेल्वे ट्रॅकजवळ कर्तव्याला होते. त्याचवेळी त्यांचे पाय रुळात अडकले, प्रदीप यांनी रुळातून पाय बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी भरधाव ट्रेन आली आणि प्रदीप यांचे पाय त्यांच्या शरीरापासून वेगळे झाले. आजूबाजूच्या लोकांनी तत्परता दाखवत त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा हा मानवतेला काळिमा फासणारा चेहरा समोर आला.
प्रदीपला स्ट्रेचरवरून उपचारासाठी नेत असताना डॉक्टर आणि वॉर्डबॉयनं त्यांच्या चक्क पायांनाच उशी बनवली. प्रदीपचे दोन्ही पाय स्ट्रेचरवर उशीच्या स्वरूपात दिसत आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलचे कार्यवाहक अधीक्षक डॉक्टर विनय गुप्ता यांनी सांगितलं की, रुग्णाचा जीव वाचवणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. रुग्णालयात अपुऱ्या सुविधा असून, रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणं आवश्यक होतं. त्यावेळी जे शक्य होतं ते आम्ही केलं आहे.
तर रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजपाल म्हणाले, एका व्यक्तीची रेल्वे रुळावर दुर्घटना झाल्याचं समजलं. परंतु आम्ही घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.