बहुजननामा ऑनलाईन टीम : आयुष्यात वेळेला खूप किंमत असते. कारण आजकाल एक एक मिनिटदेखील खूप महत्त्वाचा असतो. याच एका मिनिटाची किंमत हरियाणातील नेत्याला चांगलीच मोजावी लागली आहे. अर्ज भरण्यास एक मिनिट उशिर झाल्यानं त्यांना आता हरियाणा विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही. शुक्रवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज भरण्यासाठी काही नेत्यांना एक ते पाच मिनिट उशिर झाला त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. यामध्ये काही अपक्ष नेत्यांचाही समावेश असून उशिर झाल्याने अधिकाऱ्यांनी अर्ज भरून घेतले नाहीत.
विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाल जिल्ह्यातील नीलोखेडी आणि कर्नाल या मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी तीन उमेदवारांना उशिरा झाल्याने चांगलीच किंमत मोजावी लागली. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. मात्र, या तीन नेत्यांना या वेळेत अर्ज भरण्यास उशीर झाला. यामध्ये माजी मंत्री राजकुमार वाल्मिकी यांचा समावेश आहे. वाल्मिकी यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी पोहचलो होतो. कागदपत्रे पडताळणी करताना नोटरी अटेस्ट करावं लागेल असं सांगण्यात आलं. ते करून परत येण्यास दोन मिनिटं वेळ झाला, त्याच वेळेत अधिकाऱ्यांना अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याचं जाहीर केलं.
तसेच बाढडा येथे देखील एका उमेदवाराला पाच मिनिटे उशीर झाल्याने त्यालाही परत फिरावे लागले. उमेदवारीचा अर्ज जमा दाखल करण्यासाठी पोहचल्यानंतर अधिकाऱ्यांनी उशिर झाल्याचे सांगत अर्ज स्वीकारला नाही. यात जनता पार्टीच्या लाल सिंह यांनाही उशिर झाल्यानं अर्ज भरता आला नाही. अंबाला सिटी या विधानसभा मतदार संघातून शिरोमणि अकाली दलाने अभय चौटाला यांना दोन वाजता उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची धांदल उडाली. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करेपर्यंत उशिर झाल्यानं त्यांनाही या विधानसभा निवडणुकीला उभे राहता येणार नाही.
Visit : bahujannama.com