बहुजननामा ऑनलाईन – GST रिटर्न भरण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे. CBIC ने जाहीर केलेल्या माहितीनुसार जीएसटीआर -9, जीएसटीआर -9 ए आणि जीएसटीआर -9 सी फॉर्म भरणारे करदाता आता ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत जीएसटी रिटर्न भरण्यास सक्षम असतील. पहिले आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१९ होती. जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कर अंतर्गत नोंदणीकृत सर्व व्यापाऱ्यांना जीएसटीआर -9 फॉर्मद्वारे वार्षिक परतावा भरावा लागतो. यात वेगवेगळ्या टॅक्स स्लॅबनुसार खरेदी-विक्रीची माहिती द्यावी लागते.
आता ३० नोव्हेंबरपर्यंत जीएसटी रिटर्न भरण्यात येईल –
सीबीआयसीने पुन्हा जीएसटीचे वार्षिक रिटर्न भरण्याची तारीख वाढविली आहे. २०१७-१८ वर्षाची जीएसटी परतावा भरण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०१९ पासून ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.सीबीआयसीने एका ट्वीटमध्ये ही माहिती दिली आहे. सीबीआयसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, या अंतर्गत जीएसटीआर 9,जीएसटीआर 9 ए आणि जीएसटीआर 9 सी रिटर्न भरता येऊ शकतात. अनेकांना जीएसटी रिटर्न भरण्यात अडचण येत होती. ही मुदत वाढल्यानंतर आता व्यावसायिकांना जीएसटी भरण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
जीएसटी रिटर्न्सची मुदत वाढवण्याची ही चौथी वेळ आहे. सर्वात आधी डिसेंबर २०१८ ही जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत होती. अनेक लोकांना जीएसटी भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. तर काही लोकांना JSON फाईल अपलोड करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. त्याच बरोबर डिजिटल स्वाक्षरीसाठी ही अनेकांना अडचणी येत होत्या. १ टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी जीएसटीआर 9 सी रिटर्न भरले होते. राज्यात ठीक ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळेही नागरिकांना जीएसटी भरण्यात अडथळा येत होता. पण आता आलेल्या नवीन तारखेमुळे नागरिकांना याचा फायदा होणार आहे.