बहुजननामा ऑनलाईन- केंद्र सरकारने वाहन क्षेत्राला मोठा दिलासा देत काही महत्वाच्या घोषणा केल्या. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता.५) दिल्ली येथे झालेल्या सियाम या वाहन उत्पादक संघटनेच्या वार्षिक बैठकीत वाहन उत्पादक कंपन्यांना उद्देशून काही महत्वाच्या घोषणा केल्या.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेल वाहने थांबविण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. मात्र आज वायू प्रदूषणाच्या समस्येमुळे लोक पेट्रोल आणि डिझेल वाहने बंद करण्याच्या सूचना देत आहेत. तथापि, केंद्रीय मंत्र्यांनी वाहन उत्पादकांना हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले.
गडकरी म्हणाले की, रस्ते वाहतूक मंत्रालय येत्या तीन महिन्यांत ६८ महामार्ग प्रकल्प जाहीर करणार आहे. या प्रकल्पांच्या बांधकामासाठी सुमारे पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. याद्वारे कोट्यावधी कामगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. या महामार्गांच्या बांधकामाची तयारी अंतिम टप्प्यात असून भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. या महामार्गांच्या बांधकामामुळे वाहनांची मागणी वाढेल आणि वाहन क्षेत्रालाही त्याचा फायदा होईल. तसेच, प्रदूषणाच्या गंभीर समस्येमुळे वाहन उद्योगालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पेट्रोलियम आयातीवर वर्षाकाठी सात लाख कोटी रुपये खर्च होत असल्याने सरकार इलेक्ट्रिक आणि पर्यायी इंधनाच्या वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. यासाठी निर्यात वाढवून देशांतर्गत बाजारात वाढलेली विक्री ऑफसेट करता येऊ शकते. बँकांकडून वाहनांच्या कर्जासाठी कमी होत असलेली उपलब्धता लक्षात घेता वाहन कंपन्यानी स्वत: चे एनबीएफसी तयार करुन वाहन कर्जे उपलब्ध करुन द्यावीत. यामुळे त्यांची विक्री वाढविण्यात मदत होईल. सरकार ऑटोमोबाईल उद्योगास पूर्णपणे पाठिंबा देईल. वाहनांची विक्री वाढविण्यासाठी सरकारला कोणताही सल्ला दिल्यास सरकार त्यांचा विचार करेल. व्यवसायात चढ-उतार आणि नफा तोट्याचीही वेळ येते. यामुळे निराश होण्याची गरज नाही. असा सल्लाही यावेळी गडकरी यांनी दिला.
Nitin Gadkari, Minister of Road Transport & Highways: There were discussions & the ministry had received suggestions that petrol-diesel vehicles be banned. I would like to clearify that govt does not intend to ban petrol & diesel vehicles. We aren't going to do anything like that pic.twitter.com/8CfTEmKHIy
— ANI (@ANI) September 5, 2019