बहुजननामा ऑनलाइन टीम – परकीय बाजारात घट आणि भारतीय रुपयाच्या बळकटीमुळे सोन्या-चांदीच्या किंमती देशांतर्गत बाजारात घसरत आहेत. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २१० रुपयांनी घसरला. त्याचबरोबर १ किलो चांदीच्या भावात १००० रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, चांगल्या आर्थिक आकडेवारीमुळे अमेरिकन डॉलर बळकट झाला आहे. तसेच अमेरिकन बॉण्ड यिल्डमध्ये वाढ, कोरोना विषाणूच्या उपचारांची अपेक्षा आणि अमेरिका-चीन दरम्यान व्यापार कराराच्या शक्यतेमुळे सोन्या-चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळेही आज देशांतर्गत बाजारपेठेत पुन्हा सोने स्वस्त होऊ शकते.
वरच्या पातळीवरुन सोन्याचा भाव ५००० रुपयांनी घसरला आहे. सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५६,२०० वरुन घसरून ५१,००० रुपये झाला आहे. त्याचबरोबर चांदी प्रति किलो १३,००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. या दरम्यान किंमत ७८,००० रुपयांवरून घसरून ६५,०००० रुपयांवर आली आहे.
सोन्याची नवीन किंमत
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, दिल्ली सराफा बाजारात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,१७३ रुपये प्रति १० ग्रामने घसरून ५१,९६३ रुपयांवर आला आहे. यादरम्यान किंमतीत २१० रुपये प्रति १० ग्रामने घट झाली आहे. तर मुंबईत ९९.९ टक्के सोन्याचा भाव ५१,००० रुपये खाली आला आहे. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०९८३.०० रुपये प्रति १० ग्रामवर आला.
चांदीची नवीन किंमत
बुधवारी चांदीच्याही भावात घट झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात १ किलोग्रॅम चांदीचा भाव ६६,२५५ रुपयांवरून ६५,१७८ रुपयांवर आला आहे. यादरम्यान किंमतीत १,०७७ रुपयांची घट झाली आहे. तर मुंबईत चांदीचा भाव घसरून ६२,५४१ रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे.
आता पुढे काय होणार?
कोटक सिक्युरिटीजने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सराफा बाजाराचे लक्ष आता अमेरिकन फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे लागले आहे. गुरुवारी जॅक्सन हॉलची बैठक होणार आहे. या बैठकीत आर्थिक परिस्थितीबद्दल केंद्रीय बँकेचा दृष्टीकोन जाणून घेतला जाईल.
तज्ञ काय म्हणतात?
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनुसार, जॅकसन हॉलमधील बैठकीत व्याजदरात सातत्याने कोमलता राहण्याचे संकेत दिसू शकतात, तर त्यामुळे डॉलरमध्ये कमकुवतपणा दिसून येऊ शकतो. अशावेळी सोन्याच्या किंमतीत वाढ होईल. ते म्हणतात की, डिसेंबर अखेरपर्यंत सोने ६० हजार प्रति दहा ग्रॅमच्या पलीकडे जाऊ शकते.