नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने खरेदीला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्याची खरेदी पुन्हा एकदा महाग झाली आहे. सोमवारी सराफ बाजारात सोन्याच्या किमती घसरल्यानंतर (Bullion market fall) मंगळवारी (दि. 8) पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोने (Gold delivery rate) 119 रुपयांनी वाढत 50, 065 रुपये प्रतिदहा ग्रॅमवर उघडले. सोमवारी हे सोने 49, 946 च्या स्तरावर बंद झाले होते. सकाळी 9.50 वाजता 198 रुपयांच्या वाढीने तर 10.40 वाजता 161.00 रुपयांच्या वाढीने व्यवहार सुरू होते. आतापर्यंत 855 लॉटचा व्यवहार झाला आहे.
एप्रिलच्या डिलिव्हरीच्या सोन्यामध्येही मंगळवारी सकाळी 106 रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर सकाळी 9.50 वाजता ते 250 रुपयांच्या वाढीने 50264 च्या स्तरावर ट्रेड करत होते. यामध्ये 2 लॉटचा व्यवहार झाला आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात घट झालेली आहे. MCX वर चांदी 65,388 रुपयांच्या स्तरावर सुरू झाली. सोमवारी ही चांदी 65,499 च्या स्तरावर बंद झाली होती. सध्या चांदीच्या दरात 43 रुपयांची घट दिसत आहे. सध्या चांदीच्या 1188 लॉटमध्ये व्यवहार झाले आहेत.
सोन्याच्या दरात चढ – उतार
कोरोनामुळे पुढे ढकललेली लग्नसराई, दिवाळी आदीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीत वाढ दिसत आहे; परंतु सोन्याच्या दरात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. शेजारच्याला 48,000 रुपयांनी मिळालेले सोने लगेच दुस-या दिवशी जाताच 49, 000 वर गेलेले दिसत आहे. सोन्याच्या किमतीत (price of gold) गेल्या शुक्रवारीही घसरण नोंदविली गेली. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याचा विचार केला तर सोन्याचे दर वाढलेलेच दिसत आहेत. एमसीएक्सवर फेब्रुवारीला देय असलेल्या सोन्याच्या किमतीत 93 रुपयांची घट झाली. शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा दर हा 49,209 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. असे असले तरीही आठवडाभरात सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याची स्थिती अशीच दिसून येत आहे.
सोन्याचे दर 42,000 वर येण्याची शक्यता
जाणकारांच्या मतानुसार, डॉलरच्या दरात घसरण झाल्याने या आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. अमेरिकेत स्टिम्युलस पॅकेज जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात बाजारात सोन्याचे दर 48,000 ते 50, 000 च्या आत राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने 56,300 रुपयांचा पल्ला गाठला होता. मात्र, आतापर्यंत त्यात 7000 हजार रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी आरबीआयने आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज वर्तविल्याने सोन्य़ावर दबाव वाढला होता. महागाई वाढल्याने आरबीआयने रेपो दरात कोणतीही वाढ केली नाही. भारत आपल्य़ा गरजेचे सोने हे आयातच करतो. यातच डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी वधारल्याने 73.80 च्या स्तरावर गेला होता. नोव्हेंबरमध्ये सोने 2600 रुपयांहून स्वस्त झाले आहे, तर उच्चतम स्तरावरून सोने 4000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.