गाजियाबाद वृत्तसंस्था – एका दलित महिलेला मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केल्याचा प्रकार सिहानीगेट ठाणे क्षेत्रातील नूरनगर येथे घडला. एवढेच नाही तर पुजाऱ्याच्या मुलाने तिला शिवीगाळ करत जात विचारून लाथ मारली. त्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी सिहानी गेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
नूरनगर सिहीन येथे राहणाऱी ५० वर्षीय महिला शकुंतला देवी यांनी सांगितले की, त्या बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास घराजवळील शिव मंदिरात गेल्या होत्या. मंदिराच्या बाहेर पुजाऱ्याच्या मुलाने त्यांना रोकले आणि त्यांची जात विचारली. शकुंतला देवी यांनी आपली जात सांगितल्यानंतर त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यांनी याचे कारण विचारले तेव्हा त्याने जातिवाचक शिवीगाळ करत त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना लाथ मारली. त्यामुळे त्या खाली पडल्या. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन मुलाला याची माहिती दिली. त्यानंतर सर्वजण मंदिराजवळ गेल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी दोन्ही पक्षांमध्ये समेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशीरापर्यंत प्रयत्न करूनही पोलिसांना यश आले नाही. तेव्हा त्यांन पुढील कारवाई सुरु केली आहे.