गणेशोत्सव 2020 : पर्यायच नसेल तर फिरत्या विसर्जन हौदांमध्ये करावे : महापौर मुरलीधर मोहोळ

August 17, 2020

शिवाजीनगर : बहुजननामा ऑनलाइन –  घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन शक्यतो घरातच करावे. पर्यायच नसेल तर महापालिकेच्यावतीने क्षेत्रिय कार्यालयनिहाय उपलब्ध करून देण्यात येणार्‍या ङ्गिरत्या विसर्जन हौदांमध्ये करावे अथवा महापालिका उभारणार असलेल्या मुर्तीदान केंद्राच्या ठिकाणी मुर्तीदान कराव्यात. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांना सकारात्मक साथ दिली आहे. गणेशोत्सवामध्येही नागरिक प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज गणेशोत्सव आणि प्रामुख्याने गणेश विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह पाचही उपायुक्त, १५ क्षेत्रिय कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर मोहोळ यांनी वरिल आवाहन केले. मोहोळ म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे.

शहरात दरवर्षी ६ लाख गणेश मुर्तीचे घरगुती पूजन होते. विसर्जनाच्या ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी आणि प्रामुख्याने संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच मुर्तीचे विसर्जन करावे. ज्यांना पर्याय नसेल त्यांच्यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय ङ्गिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येईल. एका संस्थेने यासाठी हौदांची व्यवस्था असलेली ३० वाहने सीएसआरच्या माध्यमातून देण्याची तयारी दर्शविली आहे. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर या हौदांचा मार्ग, वेळ याची माहिती स्थानीक नागरिकांना देण्यात येईल. तसेच मुर्तीदानाबाबतही क्षेत्रिय कार्यालयनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यंदाच्यावर्षी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मोहोळ यांनी केले आहे.