नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महात्मा गांधीजींच्या विचारांचा देखावा करून अनेकजण प्रसिद्धी मिळवत असतात. अशा लोकांच्या डोळ्यात एका आयपीएस अधिकार्याने आपल्या कृतीतून अंजन घातले आहे. या अधिकार्याचे नाव आहे रॉबिन हिबु. ते दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी आहेत. देशातील ते एक नावाजलेले अधिकारी आहेत. ते पहिले आदिवासी आयपीएस असून ते अनेक वर्ष यूएनमध्ये राहत होते. त्यांना दोन राष्ट्रपती मेडल, अनेक अवॉर्ड, प्रशस्ती पत्रक आणि अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आपल्या करिअर दरम्यान त्यांना भेदभावालासुद्धा तोंड द्यावे लागले आहे.
स्वत:चे घर आणि साधी दुचाकीही नाही
रॉबिन हिबु हे गांधीवादाचा केवळ गवगवा करत नाहीत तर तो प्रत्यक्षात आचरणात आणतात. रॉबिन यांच्याकडे स्वत:चे घर आणि साधी दुचाकीही नाही. त्यांचे साधे लाकडाचे घर होते ते सुद्धा त्यांनी एका गरजुला देऊन टाकले आहे. त्यांच्या गावाचे नाव होंग असून ते अरुणाचल प्रदेशातील चीन सीमारेषेजवळील घनदाट जंगल आणि डोंगररांगानी पसरलेल्या भागात आहे. या गावात मूलभूत सोयीसुविधा नसतानाही रॉबिन हिबु हे 1993 साली स्पर्धा परीक्षेतून निवडून आले. त्यांचे वडिल लाकूडतोडण्याचे काम करून कुटुंबाचे उदरभरण करत होते. अशा गरीबीत त्यांचे बालपण गेले आहे.
महात्मा गांधी यांना वर्णभेदामूळे जून 1893 मध्ये आफ्रिकेत चालत्या गाडीतून बाहेर काढण्यात आले होते. असाच प्रसंग रॉबिन यांच्यासोबत सुद्धा घडला आहे. जेएनयूमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर ब्रम्हपूत्र मेलने प्रवास करत असताना तिकीट असतानाही त्यांना जागेवरुन हटवण्यात आले होते. यानंतर त्यांनी दिल्ली पर्यंतचा प्रवास शौचालयाजवळ बसून केला होता. त्यांची चेहरेपट्टी पाहून त्यांना चीनी समजून अनेकजण टीका करत असत.
या अधिकार्याने आपल्या गावातील 8 खोल्यांचे दोन मजली घर गांधी म्युजियमसाठी दिले आहे. राजघाट येथील म्युजियमने बापूंची चप्पल आणि चश्मा देण्याचे आश्वासन या म्युजियमला दिले आहे. येथे एक मोठी लायब्ररी असून विद्यार्थी तेथे वाचन करू शकतात. याच ठिकाणी त्यांची आई मोफत डिस्पेंसरी चालवते. गावातील लोकांसाठी हेल्पिंग इंडिया नावाची संघटनाही रॉबिन यांनी स्थापन केली आहे.
Visit : bahujannama.com