नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोपामुळे अडचणीत आलेले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा अद्याप सुरु असतानाच ईडी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आज (मंगळवार) नागपूरमधील त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आहे.
ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ECIR म्हणजे FIR दाखल केला आहे. त्यानंतर आज सकाळी नागपूरमध्ये ईडीने छापा टाकला आहे. नागपूर शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सागर भटेवार यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकवर्तीय व व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. सागर भटेवार हे मागील काही दिवसांपासून अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला असल्याचे सूत्रांकडून समजतेय. ईडीची टीम भटेवार यांच्याकडे चौकशी करत आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयाने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच FIR दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयाने देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करुन त्या तपासाच्या आधारे 21 एप्रील रोजी दिल्ली येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयाने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.