नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०२० हे वर्ष अनेक अडचणींचा सामना करण्यात गेले आहे. मात्र असे असतानाही काही सुखद घटनाही घडल्या आहेत. क्रिकेटमध्ये या वर्षी विशेष अशी कामगिरी करता आली नसलं तरी वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फाईव्ह फलंदाजांमध्ये लोकेश राहुल या एकमेव भारतीय खेळाडूनं स्थान पटकावलं आहं. विशेष म्हणजे पहिल्या चारमध्ये ऑस्ट्रेलियाचेच खेळाडू आहेत.
या यादीत अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंच आहे. त्यानं १३ सामन्यांत ५६.०८च्या सरासरीनं ६७३ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे आणि ती दोन्ही शतकं भारताविरुद्ध झळकावलेली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑसी स्टीव्हन स्मिथ आहे. त्यानं १० सामन्यांत ६३.११च्या सरासरीनं ५६८ धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत त्यानं मालिकावीर हा पुरस्कारही पटकावला. यंदाच्या वर्षात स्मिथनं ३ शतकं झळकावली. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचाच मार्नस लाबुशेन असून त्याने ४७३ धावा केल्या आहेत. डेव्हीड वॉर्नर ४६५ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. तर लोकेश ४४३ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहलीला अव्वल पाचात स्थान पटकावता आलेले नाही.
विराटने ४३१ धावांसह सहावे स्थान पटकावले आहे. फक्त १२ धावांनी लोकेश राहुलनं त्यावर यंदा कुरघोडी केली. २००९ नंतर प्रथमच विराटला कॅलेंडर वर्षात एकही शतक झळकावता आलेले नाही. ओमानचा अकिब इलिहास दोन शतक व दोन अर्धशतकांची खेळी करून ४०० धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल ३५३ धावांसह आठव्या क्रमांकावर नवव्या स्थानावर इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो ( ३४६ धावा) आहे. भारताच्या श्रेयस अय्यरनं ३३१ धावांसह दहावे स्थान पटकावले आहे.