जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांपैकी भाजपच्या 5 जणांनी संस्कृत भाषेतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्य़ाचा धक्का दिला आहे. भाजपच्या नेतृत्वानेही या पाचही जणांचे कौतुक केले आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांना उपायुक्तांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. दरम्यान संस्कृतमधून शपथ घेतलेल्या पाच सदस्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजते.
जम्मू आणि काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या बहुतांश नवनिर्वाचित सदस्यांनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. मात्र, जम्मू विभागातील 5 सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली आहे. या पाच सदस्यांपैकी तीन सदस्य उधमपूर जिल्ह्यातील असून, सांभा आणि कठुआ भागातील एक-एक सदस्याचा यात समावेश आहे. जम्मू काश्मीर विभागात निवडून आलेल्या सदस्यांपैकी सांभा जिल्ह्यातील विजयपूर-बी येथील शिल्पा दुबे, कठुआ जिल्ह्यातील हीरानगर येथील अभिनंदन शर्मा, उधमपूर जिल्ह्यातील खून येथील जूही मन्हास, लट्टी मारोठी येथील पिंकी देवी आणि जगानूं येथील परीक्षत सिंह या पाच नवनिर्वाचित सदस्यांनी थेट संस्कृत भाषेतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
उधमपूरचे उपायुक्त डॉ. पीयूष सिन्हा म्हणाले की, नवीन सदस्यांना त्यांच्यासाठी सहज व सोप्या असलेल्या भाषेत शपथ घेण्याची मुभा दिली होती. 5 जणांनी संस्कृत भाषेत, तर काही जणांना पारंपरिक भाषेत शपथ घेतली, असे ते म्हणाले. भाजपच्या नेतृत्वानेही या पाचही जणांचे कौतुक केले असल्याचे ते म्हणाले.