बहुजननामा ऑनलाईन- भारत पाकिस्तानात तणावाचे वातावरण असताना एक आनंदाची बाब समोर आली आहे. पाकिस्तानात पहिल्यांदाच एका हिंदू मुलीची पोलीस अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात राहणाऱ्या पुष्पा कोहली यांची नेमणूक नुकतीच असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदावर झाली. त्यांनी सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा दिली होती. पाकिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर करत याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, सिंध लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन असिस्ंटट सब इन्स्पेक्टर बनणारी पुष्पा ही इथल्या हिंदू समुदायातील पहिलीच मुलगी आहे. पाकिस्तानमध्ये सुमारे ७५ लाख हिंदू राहतात. ते इथे अल्पसंख्याक आहेत. जानेवारी २०१९ मध्ये हिंदू समुदायातील सुमव पवन बोडानी पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीशपदी नियुक्त झाल्या. त्याही सिंध प्रांतात राहणाऱ्या आहेत.
त्यांनी न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या मेरिट लिस्टमध्ये ५४ वा क्रमांक मिळवला. तर मार्च २०१८ मध्ये पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या नेत्या कृष्णाकुमारी यांनी संसदेची निवडणूक जिंकली होती. हिंदू समुदायातून येऊन खासदार बनलेल्या त्या पहिल्याच महिला ठरल्या.
Excellent News: Pushpa Kolhi has become the first girl from #Hindu community who has qualified provincial competitive examination through Sindh Public Service Commission and become Assistant Sub Inspector (ASI) in Sindh Police. More power to her! #WomenEmpowerment pic.twitter.com/EALTHCkeVP
— Kapil Dev کپل دیو (@KDSindhi) September 3, 2019