बहुजननामा ऑनलाईन – आधीच अर्थव्यवस्था डबघाईला आलेली. त्यात इतर देशांकडून घेतलेला कर्जाचा बोजा असताना आता पाकिस्तानाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) या संस्थेच्या एशिया पॅसिफिक गटाने पाकिस्तानला ‘ब्लॅकलिस्ट’ केलं आहे. यापूर्वी एफएटीएफने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलं होतं.
भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएफटीएफच्या एशिया पॅसिफिक गटाने जागतिक निकष पूर्ण करु न शकल्याने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केले आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याशी संबंधित ४० निकषांपैकी ३२ निकष पाकिस्तानने पूर्ण केले नाहीत. परिणामी एफएटीएफने पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट केलं.
काळ्या यादीत नाव आल्यानंतर आता पाकिस्तानला जगातील कोणत्याही देशाकडून कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. एफएटीएफ कडून याबाबत माहिती मिळाली आहे की, ‘पाकिस्तान दहशतवाद्यांच्या टेरर फंडिंगसंदर्भात आपला कृती आराखडा पूर्ण करु शकला नाही. हा आराखडा पुर्ण करण्यासाठी पाकिस्तानला जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण पाकिस्तानने मे २०१९ पर्यंत देखील आपलं काम पूर्ण केलं नाही.’ आधीच ग्रे यादीत आणि आता कृती आराखड्यानुसार काम करण्याचं दिलेल आश्वासन पाकिस्तान पुर्ण करु शकला नाही. त्यामुळे आता पाकला येत्या ऑक्टोबर २०१९ पर्यंत काळ्या यादीतून बाहेर येण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.