बहुजननामा ऑनलाइन टीम – जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. प्रकृती अस्वास्थेच्या कारणास्तव त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. जपान ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. पत्रकार परिषद घेऊन आबे यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना आबे म्हणाले, मी पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर अल्सरेटिव कोलाइटिस या आजरावर उपचार सुरु असून त्यांनी सांगितले की, नवीन उपचार घेत आहेत. त्यानुसार, नियमितपणे आरोग्य तपासणी आणि लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उपचार सुरु असल्याने मी पंतप्रधान म्हणून कर्तव्य पूर्ण पणे पार पाडू शकत नाही. जनतेने बहुमत देऊन पुन्हा विश्वास दाखवला होता. पण, पूर्ण क्षमतेनुसार आपण काम करु शकत नसल्याचे त्यांनी म्हटलं. तसेच एक वर्षाचा कालावधी राहील असताना मी पद सोडत असून जपानी जनतेची माफी मागत आहे, असे आबे म्हणाले. त्यावेळी ते भावुक झाल्याचं दिसून आलं.
मागील आठवड्यात आबे दोन वेळा रुग्णालयात दाखल झाले होते. वारंवार रुग्णालयात जात असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा करण्यात येत होती. आबे यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यत आहे. प्रकृतीच्या कारणामुळे आबे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु होती. या चर्चेचा परिणाम जपान शेअर बाजारावर झाला असून मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली.
जपानच्या पंतप्रधान पदी सर्वाधिक काळ राहणारे ते पहिलेच व्यक्ती होते. गेल्या सोमवारी त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाची आठ वर्षे पूर्ण केली. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये ३० टक्के घट नोंदवण्यात आली. त्यांच्या सरकारवर आणि पक्षावर घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले. जपानची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेले. तर चीनचा धोका ओळखून त्यांनी आपल्या सैन्याला अधिक सुसज्ज करण्याचा प्रयत्न सुरु केलेला.