बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना प्रादुर्भावाचा फटका मनोरंजन क्षेत्रालाही बसला असून अनेक मराठी चित्रपटांना सेन्सॉर प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही.(censorship certificates) या वर्षामध्ये निर्मिती झालेल्या परंतु, सेन्सॉर प्रमाणपत्र नसलेल्या चित्रपटांना ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) प्रवेश मिळणार आहे.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ या महोत्सवाने उपलब्ध करून दिले आहे. महोत्सवाच्या नियमावलीप्रमाणे सहभागी चित्रपटांना ३१ डिसेंबरपूर्वी सेन्सॉर संमत असणे आवश्यक आहे. परंतु, कोरोनाच्या फटक्यामुळे आणि कमी कालावधीमुळे ३१ डिसेंबर २०२०च्या आत सेन्सॉर प्रमाणपत्र मिळणे शक्य वाटत नाही. त्यामुळे या वर्षात निर्मिती झालेल्या चित्रपटांचे नुकसान होऊ नये आणि त्यांना स्पर्धेसाठी पात्र होता यावे यासाठी यंदा ‘सेन्सॉर संमत’ आणि ‘सेन्सॉर न मिळालेल्या’ अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना प्रवेशाची सवलत मिळावी, अशा विनंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे केली होती. ही विनंती मान्य करत पटेल यांनी २०२० या वर्षासाठी सेन्सॉर संमत आणि सेन्सॉर न मिळालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मराठी चित्रपटांना महोत्सवात सहभागी होण्याची मुभा दिली आहे.