बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड विभागात कार्यरत असलेले डॉक्टर अखिल अशोक अग्रवाल यांच्या अंगावर धावून जात रुग्णाच्या नातेवाईकाने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार डॉ. अग्रवाल यांनी तत्काळ वरिष्ठांच्या कानावर घातला. मात्र त्याची दखल न घेतल्याने अग्रवाल हे तडकाफडकी राजीनामा देत रुग्णालयातून बाहेर पडले. घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी काही वेळ काम बंद केले.
डॉक्टर अखिल अग्रवाल कोविड विभागात रुग्णांची तपासणी करत होते. त्यावेळी पटवेकर नावाच्या एका तरुणाने जोरात ओरडून डॉक्टर अग्रवाल यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीचा आवाज ऐकून खुद्द डॉक्टर अग्रवाल चर्चा करण्यासाठी त्याच्या समोर आले असता पटवेकर त्यांच्या अंगावर धावला. उपस्थित कर्मचार्यांनी हस्तक्षेप केला म्हणून अनर्थ टळला. घडलेला प्रकार कर्मचार्यांनी वरिष्ठांच्या कानी घातला, परंतु वरिष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उपस्थित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी सुमारे अर्धा-पाऊण तास काम बंद केले. वरिष्ठांकडून दखल घेतली जात नाही म्हणून डॉक्टर अग्रवाल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्याची बाजू ऐकून घेत कारवाईचे आश्वासन दिले.