बहुजननामा ऑनलाईन टीम – भाजपने आता हमीरपुर पोट निवडणुकीनंतर इतर दहा जागांसाठी उमेदवारीची घोषणा केली आहे. यात मऊमधल्या घोसी या जागेची सर्वात जास्त चर्चा होत आहे. कारण भाजपने या जागेवरून रस्त्यावरील भाजी विक्रेत्याच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. भाजपने घोसी जागेवरून विजय राजभर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या जागेवर बिहारचे राज्यपाल असलेल्या फागू चौहान यांच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची आशा होती. पण आता हि जागा विजय राजभर यांना देण्यात आली.
भाजपचे तिकीट मिळाल्यानंतर विजय राजभर म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवून संघटनेनं मला मोठी जबाबदारी दिली आहे. माझे वडील रस्त्यावर भाजी विकतात या परीक्षेत मी पास होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.” तर फागू चौहान यांना बिहार राज्याचे राज्यपाल बनवण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजी विक्रेत्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा होता. मऊमध्ये विजय राजभर हे पार्टीचे नगराध्यक्ष आहेत. ते नेहमीच राजकारणात सक्रिय असतात. नगरपालिका निवडणूकितही ते निवडून आले होते. मुलाला भाजपकडून विधानसभेचे तिकीट मिळाल्याने वडिलांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विजय राजभर यांच्या वडिलांनी आभार व्यक्त केले आणि मुलाला विजयासाठी आशीर्वादही दिले. उत्तर प्रदेश मधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याचबरोबर आसाम ४, हिमाचल प्रदेश २, बिहार १, सिक्कीम २, मध्यप्रदेश १, छत्तीसगड १, मेघालय १, ओडिसा १, राजस्थान 1,तेलंगणा १ या भाजपाच्या पहिल्या यादीत समावेश आहेत.
Visit : bahujannama.com