बहुजननामा ऑनलाइन – बँक खाते उघडण्यासाठी पडताळणीची प्रक्रिया आता डिजिटल केवायसी (आपल्या ग्राहकांना जाणून घ्या) द्वारे केली जाणार आहे. ग्राहकांसाठी ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित असल्याची माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी दिली.
ते म्हणाले, “मोबाइल कनेक्शन देण्यासाठी डिजिटल केवायसी टेलिकॉम क्षेत्रात यशस्वी झाली आहे. बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड, मतदानाचे ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तो टेलिकॉम क्षेत्राप्रमाणे डिजिटल केवायसीची निवड करू शकतो. पडताळणीसाठी करण्यात आलेली डिजिटल केवायसीची प्रक्रिया सुरक्षित आणि फसवणूक मुक्त आहे. तसेच ज्यांना बँक खाते उघडण्यासाठी आपला आधार क्रमांक सार्वजनिक करायचा नसेल त्यांनी डिजिटल केवायसी पर्याय निवडावा.
सरकारने मनी लॉन्ड्रिंग विरोधातील नियमातील संशोधनाबाबच सुचना दिल्या होत्या. यामध्ये बँक खाते उघडण्यासाठी आधारच्या ऐच्छिक वापरास परवानगी देण्यात आली आहे. यासह मतदार ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सारख्या कागदपत्रांच्या माध्यमातून पडताळणीच्या बाबतीत डिजिटल केवायसीसाठी तपशीलवार प्रक्रियेचा उल्लेख करण्यात आला आहे. या अधिसूचनेमुळे पडताळणीच्या विविध यंत्रणेच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी आणि डिमॅट खाती उघडण्यासाठीही अशीच पद्धत अवलंबली जाते. केवायसी च्या माध्यमातून बँकाना ग्राहकांविषयी संपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे केवायसीच्या माध्यमातून कोणीही बँकिंग सेवांचा गैरवापर करीत नाही हे निश्चित होते.