पुणे : Eknath Shinde Shivsena Vs Ajit Pawar NCP | महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरु झाला आहे. बारामती अडचणीत आणाल तर परिणाम कल्याणमध्ये होईल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला आहे. कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र उमेदवार असण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिरुर मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील उमेदवार नकोत असे म्हणत उघड आव्हान दिले आहे. त्याबद्दल अद्याप शिवसेनेने उघड प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मतदारसंघातून लोकसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांना विजय शिवतारे यांच्यासारख्या आपल्या नेत्यांना आवरावे. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावे,असा इशारा दिला आहे.
आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकालदेखील लागू शकतो. हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे वाटत असेल तर वाचाळवीर विजय शिवतारे यांना अडवावे. त्यांना योग्य ती समज द्यावी.
आमदार अमोल मिटकरी यांनी शिवतारे यांनी हलकटपणाचा कळस केला असून त्यांना आवरावे असा इशारा समाज माध्यमातून दिला आहे.
बच्चू कडूंच्या दाव्यामुळं भाजप, शिवसेना अडचणीत, राणांचं टेन्शन वाढलं