चिमूर : बहुजननामा ऑनलाइन – गडचिरोली मधील चिमूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार अशोक नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. माना आणि धनगर समाजाच्या आरक्षणविरोधातील कथित वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्याविरोधात माना आणि धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
२१ जानेवारीला सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे गोंडवाना संमेलन आणि गोंड संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कार्यक़्रमाचे उद्घाटन चिमूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधतांना धनगर आणि माना जमातीला आरक्षण मिळू देणार नाही असे वक्तव्य केल्याचे समोर आले होते. खासदार अशोक नेते यांच्या त्या वक्तव्यामुळे माना आणि धनगर समाजाचे मन दुखावले गेले. त्यामुळे याचा संताप व्यक्त करत खासदार अशोक नेते यांच्या विरोधात माना आणि धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी, माना आणि धनगर समाजातील नेते तसेच, माणसे आणि महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मात्र मी वेगळे वक्तव्य केले आहे. माझे वक्तव्य हे चुकीच्या पद्धतीने माध्यमात आले आहे. आणि यामागे विरोधकांचे षड्यंत्र आहे असा. आरोप खासदार अशोक नेते यांनी केला आहे.