पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बाणेर येथील जागेवर अतिक्रमण केल्याच्या वादातून माजी आमदार विनायक निम्हण आणि त्याचे पुत्र सनी निम्हण यांच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर यापूर्वी सनी निम्हण यांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार बाणेर येथील प्लॉट क्रमांक 36,64 जवळ घडला होता. याबाबत संजय तुकाराम जगताप (वय-39 रा. विठ्ठलनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या तक्रारीवरून पोलसींनी माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संजय जगताप यांच्या तक्रारीनुसार, 6 जुलै रोजी सकाळी सहा वाजता ते कामगारांना चहा देऊन खुर्चीवर बसले होते. त्यावेळी निम्हण त्या ठिकाणी आले. त्यांनी कामगारांना शिवीगाळ करून जागा काय तुमच्या बापाची आहे काय, असे बोलल्याने जगताप हे खुर्चीतून उठले असता आरोपींनी हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादी यांच्या डोक्यावर आणि पोटावर मारून जखमी केले.
सनी निम्हण यांनी संजय जगताप यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार, निम्हण यांची सर्व्हे नं. 39/5 येथे जागा आहे. या जागेवर संजय जगताप व त्याच्या साथीदारांनी 1 जुलै रोजी दुपारी दोन वाजता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सनी निम्हण व रखवालदार विपुलकुमार सिंग यांनी प्रतिकार केला होता. 6 जुलै रोजी सकाळी 6 वाजता विपुलकुमार सिंग यांनी फोन केल्याने सनी निम्हण हे त्याच्या जागेवर पोहचले. त्यावेळी संजय जगताप आणि त्याचे साथीदार बोर्डाला काळा रंग लावण्याचा प्रयत्न करत होते. तर काहीजण पत्र्याचे शेड टाकण्याचे काम करत होते. याबाबत जगताप याला विचारणा केली असता हा बोर्ड कुलकर्णी यांनी लावण्यास सांगितले असल्याचे सांगितले. तसेच तू मध्ये पडू नको, नाही तर मी तुला संपवून टाकतो. तुझा बाप वाचला आता मी तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन शिवीगाळ करत मारहाण केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी संजय जगताप विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न या प्रकरणाबाबत विनायक निम्हण यांनी सांगितले की, 20 एकराचा प्लॉट असून यातील काही जागेची विक्री करण्यात आली आहे. गेली 20 वर्षे हा प्लॉट आमच्या ताब्यात असून महापालिकेनेही त्यात काही बदल करण्यास स्थगिती दिली आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने आपल्याला पॉवर ऑफ एॅटर्नी दिल्याचे संजय जगताप सांगतो. या संजय जगतापनेच यापूर्वी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला होता.त्यात जगतापला न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो जामीनावर सुटला आहे.