नंदूरबार : बहुजननामा ऑनलाईन – अशोक बच्छाव यांनी कन्येचा विवाह सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांना संविधानाची प्रत भेट देऊन सत्कार केल्याने हा विवाह अनोखा ठरला आहे. बच्छाव यांनी संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविला. शहादा येथील अशोक बच्छाव यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाहीची मूल्य जोपासणारी संविधानाची प्रती विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेट देऊन समाजात आदर्श निर्माण केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची मूल्य जोपासणारी आणि राष्ट्रप्रेमाची प्रतीक असलेले संविधान २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाला सुपूर्द केले होते. या संविधानाची २६ जानेवारी १९५० पासून अंमलबजावणी झाली.
देशातील प्रत्येक नागरिकाला संविधान समजले पाहिजे. त्यांना त्यांच्या न्याय हक्काची माहिती झाली पाहिजे या हेतूने बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली आहे. संविधान प्रत्येक घरात असले पाहिजे. हा हेतू देखील त्यामागे होता. अशोक बच्छाव यांनी त्यांची कन्या प्रसन्ना हिच्या विवाह सोहळ्यात शिक्षण, सामाजिक, राजकिय, पत्रकारिता अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पारंपारिक पद्धतीने शाल, पुष्पगुच्छदेऊन सत्कार न करता बाबासाहेबांनी समस्त मानवजातीसाठी नीतिमूल्ये रुजविण्यााकरिता केलेल्या संविधानाच्या प्रती भेट देऊन सत्कार केला. विवाहसोहळ्यात हा आगळावेगळा उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला आहे.