अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अमरावती पोलिसांनी नागपूरातून अटक केली. कर्नाटकातील मुळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना शिवकुमार याला नागपूर रेल्वे स्थानकावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी आत्महत्या केल्यानंतर शिवकुमार याला आज नागपूर रेल्वे स्थानकातून कर्नाटककडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये बसताना ताब्यात घेतले.
नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतल्यानंतर शिवकुमार याला घेऊन पोलीस अमरावतीच्या दिशेने निघाले आहेत. शिवकुमार याला आधी अमरावती येथे आणि नंतर धरणी येथे नेण्यात येणार आहे. शिवकुमार यांच्या वरिष्ठांची देखील या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे, असे अमरावतीचे पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी एन यांनी सांगितले.
विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिला. अमरावती पोलीस सकाळी नऊ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचले. अमरावतीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय हे त्यांच्या पथकासह नागपूरमध्ये आले. त्यांनी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शिवकुमार याचा शोध सुरु केला. तो रेल्वे गाडी 02296 दिल्ली बंगळूर एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या तयारीत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास ताब्यात घेतले.
गरज भासल्यास वरीष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी
मोळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरीसाल येथील नव परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. या अनुषंगाने उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करुन आणखी काही वरिष्ठ अधिकारी दोषी आहेत का हे तापासून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. हरीबालाजी यांनी सांगितले.