वाशिम : बहुजननामा ऑनलाईन – येथील आदिवासी मुलींच्या वसतीगृहातील गृहपालाच्या पतीने विद्यार्थीनीचा विनयभंग केला. या प्रकरणाने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याने पाचही जिल्ह्यातील आदिवासी समाजांच्या पंधरा संघटनांंचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अकोला जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच गृहपालाविरुध्द तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात सेवानिवृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, यवतमाळ जि.प.च्या माजी अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे, जितेंद्र मोघे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक खिल्लारे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रघुनाथ चाफे, सेवानिवृत्त नियोजन अधिकारी डॉ. महादेवराव डाखोरे आदिंच्या नेतृत्त्वात वाशिम जिल्हाधिकारी यांना दिवासी समाजाच्या पंधरा संघटनानी संयुक्तरित्या निवेदन दिले.
त्यानुसार अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सोनोने यांना वसतीगृहातील घटनेपूर्वी मुलींनी निवेदन दिले. सोनोने यांनी तक्रार गांभीर्याने घेवून कारवाई केली असती तर अनुचित प्रकार घडलाच नसता. त्यामुळे संबंधित प्रकल्प अधिकारी व वसतिगृहाचे संबंधित गृहपाल यांना निलंबित करून कारवाईची मागणी करण्यात आली.उपरोक्त मागण्या पंधरा दिवसात निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी सुनील दानवे, आनंदराव पवार, देवानंद जावळे, राजेश मस्के,विजयकुमार भुरकाडे,बाबाराव साखरे, काशिनाथ लोखंडे, किसनराव करवते, बंडूभाऊ वाघमारे, जुमनाके, भीमराव लोखंडे, डॉ. टारपे, नाजुकराल भोंडणे, सुखनंदन नांदे, भगीरथ भोंडणे, रामेश्वर शेळके, अरविंद साखरकर आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.