पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. गंभीर बाबमध्ये पुण्यात दिवसेंदिवस मृतांची संख्या देखील वाढू लागली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलीस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन आढावा घेतला.
या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन होणार की नाही याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. पुण्यामध्ये 1 एप्रिल ते 14 एप्रिल या काळात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी प्रशानाकडून होत होती. मात्र, प्रशासनाच्या या मागणीला अजित पवार आणि आयएएस अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने 1 एप्रिलपूर्वी आणखी एक बैठक घेण्याचे ठरले. यामुळे तुर्तास पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
RTPCR चाचण्यांचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. नेमके किती ‘खरे’ पॉझिटिव्ह आहेत याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेकडून देण्यात येणाऱ्या अहवालाची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात येणार आहे. पुण्यात कोरोना बाधितांची आढळून येणारी संख्या 6 हजारांच्यावर आहे. यामध्ये अनेक जणांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या आहेत. त्यामधील काही जणांना कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे खासगी प्रयोगशाळा ICMR चे निर्बंध पाळतात का याची तपासणी केली जाणार आहे. आजच्या बैठकीत एकूण रुग्णसंख्या आणि लक्षणे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी 1 एप्रिलआधी आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज झालेल्या बैठकीत पुण्यामध्ये कडक लॉकडाऊन करावा अशी मागणी प्रशासनाने केली. मात्र यास अजित पवार यांनी विरोध दर्शवला. लॉकडाऊन पेक्षा कडक निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. परंतु पुण्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता 1 एप्रिलआधी आणखी एक आढवा बैठक घेण्याचे ठरले. यामध्ये पुण्यात लॉकडाऊन करायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांनी सांगितले की, परिस्थिती गंभीर आहे, मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवावे लागणार आहे. पुण्यात आकडेवारी वाढत आहे. 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेतले जाणार आहेत. याशिवाय 16 लसीकरण केंद्र शहर व ग्रामीण भागात आहेत. यामध्ये वाढ करुन ती दुप्पट करण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.